Monday, 7 April 2014

"old is gold"




                                       " जूने ते सोने"   

            आजकालच्या विनोदाच्या दर्जाला झालंय काय तेच कळत नाही. आजच्या नव्या पिढीने डोक्यावर घेतलेले विनोदी सिनेमे,कॉमेडी शोज् प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तीव्रतेने जाणवते की पूर्वीच्या आणि आजच्या विनोदाच्या दर्जात जमीन-अस्मानाचा फरक पडलाय. मी स्वतः लहानपणीपासून पु. ल. देशपांडे, शिरीष कणेकर यांची पुस्तके, विविध लेखकांची उत्कृष्ट मराठी विनोदी नाटके वाचत आणि बघत आलेय. या पार्श्वभूमीवर नवीन जमान्याच्या विनोदाची पातळी कमालीची खालावाल्याची खात्री पटते.  
            सध्या टि.व्ही. वर कॉमेडी शोज् च पेव फुटलय. कॉमेडी नाईट, कॉमेडी सर्कस, कॉमेडी एक्सप्रेस असे कार्यक्रम लोक आवडीने बघतात. हे कार्यक्रम सादर करणारे कलाकार हायेस्ट पेड कॉमेडीअन्स बनल्याचे ऐकण्यात येते. सगळीकडे त्यांना कौतुकाचे हारतुरे मिळत आहेत. परंतु हे कार्यक्रम जेव्हा अध्येमध्ये पाहण्यात येतात तेव्हा मला तर ते ५ मिनिटांपेक्षा जास्त बघवतही नाहीत. त्यातले कमालीचे वाईट विनोद ऐकून कानाला इंगळ्या डसल्यासारखे वाटते. तीच गोष्ट आजच्या विनोदी सिनेमांची. हे सिनेमे पूर्णपणे मेंदू आणि विचारशक्ती गहाण ठेउनच बघण्याचे असतात आणि हेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान चालतात. अश्या परिस्थितीत खरच शंका निर्माण होते की वाईट विनोद सहन न होणारे आपण शहाणे की या तथाकथित विनोदी कलाकारांना आणि चित्रपटांना डोक्यावर घेणारे लाखो लोक शहाणे? 
            विनोदांचे विषय, त्यांचे सादरीकरण इतकेच नाही तर त्यांचे श्रोते या सगळ्याच घटकांमध्ये काळानुसार फरक पडला आहे. जुन्या व नव्यात तुलना करायची म्हटली तर हे प्रकर्षाने जाणवते. मराठी साहित्यात अनेक दर्जेदार लेखकांनी विनोदी लेखनाची भर टाकली. त्यात व. पु. काळे, शिरीष कणेकर या नावांना परिचयाची आवश्यकता नाही. आणि पु. ल. देशपांडे हे तर मराठी विनोदी साहित्याचे शिरोमणी. या लेखकांच्या कथांमधली बहुतेक कथानके ही
मध्यमवर्गीय समाजाला केंद्रबिंदू ठेऊन गुंफलेली आहेत त्यामुळेच त्या कथा वाचकांना आपल्या, जवळच्या वाटतात. वाचक त्यातील व्यक्तिरेखांशी समरूप होऊन जातो. या लेखकांची नुसती पुस्तके वाचतानाही पोट दुखेपर्यंत हसू येते. याच्या अगदी उलट चित्र आजच्या ह्या कॉमेडी शोज् मध्ये दिसते. या कलाकारांना विनोद निर्माण करण्यासाठी नट-नट्या, राजकारणी नेते, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या सामाजिकच नाही तर खाजगी आयुष्याचा आधार घ्यावा लागतो. विचित्र पोशाख, बायकांसारखे वेश, चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांना हसवावे लागते. त्याहूनही वाईट म्हणजे आजकालचे हे विनोद बरेचसे द्वयर्थी आणि अश्लीलते कडे झुकणारे असतात. त्यांच्यामूळे  मुलांवर चुकीचा  प्रभाव पडण्याचीच शक्यता जास्त आहे. यावरही कळस म्हणजे तिथे येणारे तथाकथित परीक्षक फुटकळ विनोदांवर असे काही गडगडाटी हसतात कि ते पाहून आपण हसावे कि रडावे हे कळत नाही. जुन्या पिढीचे श्रोते व वाचकही स्वतःला निखळ आनंद मिळावा या हेतूने विनोद जवळ करणारे आहेत. चांगल्या विनोदावर खरंच मनमुराद हसण्याचा आनंद घेतात. पण या कॉमेडी शोज् मध्ये समोर बसवलेले लोक हे केवळ टि. व्ही. वर दिसण्याच्या अपेक्षेने आल्यासारखे वाटतात. ( किंवा तिथे बसण्याचा आणि हसण्याचा मोबदलाही मिळत असण्याची शक्यता असावी.) या शोज् मध्ये मोठे मोठे नट-नट्याही हजेरी लावतात. तेही बहुदा स्वतःच्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठीच ( आणि मोठ्या मानधनाच्या बदल्यातच). या सर्व प्रकारात असे विनोद करणारे कलाकार आणि त्यावर खदाखदा हसणारे लोक यांचा राग येण्यापेक्षा कीवच करावीशी वाटते. 
               अश्या वेळी जुन्या लेखकांच्या लेखनाची आठवण होते. त्यांच्या लेखनात एक निरागस चावटपणा असूनही थिल्लरपणा चुकुनही दिसत  नाही. या पुस्तकांची कितीही पारायणे केली तरीही प्रत्येकवेळी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसू येते. प्रकाश नारायण संत यांचा ' वनवास , शारदा-संगीत, झुंबर, पंखा अश्या चार पुस्तकांचा संच माझ्या खूप आवडीचा आहे. लंपन नावाच्या छोट्या मुलाची ही गोष्ट. या लहान मुलाच्या दृष्टीकोनातून त्यांनी केलेले त्याच्या आजूबाजूचे जग, त्याचे आजी आजोबा, मित्र यांचे वर्णन फार सुंदर आहे. त्या मुलाचे निरागस विचारही वाचकाच्या
ओठांवर हसू आणतात. पु. लं. च्या अंतू बरवा, नारायण, चितळे मास्तर, पेस्तन काका यांसारख्या कथांमध्ये विनोदालाही एक कारुण्याची किनार आहे. त्यामुळे हसता हसता डोळेही पाणावतात. या सर्व लेखकांच्या कथा कितीही अशांत मनस्थितीत वाचल्या तरी क्षणात सगळी मरगळ दूर होऊन आनंदी वाटायला लागते. हि त्यांच्या विनोदाची ताकद आहे. पु. लं. बद्दल तर जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे तरी अजून लिहील्यावाचून राहवत नाही. त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम पाहणे व ऐकणे तर पुस्तके वाचण्याहूनही अधिक मनोरंजक आहे. त्यांचे हावभाव, वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसाठी काढलेले वेगवेगळे आवाज हे त्या कथेत जीवंतपणा आणतात. 
            आजची नवी पिढी या सर्व खजिन्याला मुकली आहे. म्हणूनच टि. व्ही. वाहिन्यांना सल्ला द्यावासा वाटतो कि मुलांवर चुकीचा परिणाम करणारे हे कॉमेडी शोज् बंद करून त्या ऐवजी जुन्या लेखकांचे कथाकथनाचे कार्यक्रम, उत्तम विनोदी नाटके परत दाखवणे सुरु करावे !!
             जाता जाता पु. लं. च्या चाहत्यांसाठी त्यांच्या 'पानवाला' या कथेतील पानवाल्याच्या दुकानातील एका चित्राचे वर्णन :- 
          "पानवाल्याच्या दुकानात काचेवर काढलेल्या चित्राची सर कशालाच येणार नाही. अहो, अजन्ठातल्या चित्रकारासारखे हे चित्रकार सुद्धा अज्ञात आहेत.  त्याने काढलेल्या सूर्योदयाच्या देखाव्यानी  तर साक्षात सुर्य-नारायणाच्या डोळ्यासमोर काजवे चमकतील. आकाशात विमान आहे. विमानातून बाहेर डोकावणारा आणि डोळ्यापेक्षाही रुंद काळा गॉगल लावलेला असा पायलट आहे. पुलावर आगगाडी आहे. पुलाखाली गलबत आहे. गलबताखाली खाडी आहे. खाडीत कमळे आहेत. खाडीच्या बाजूला राजवाडा आहे. राजवाड्याच्या कमानीवर वेलकम असा बोर्ड आहे. राजवाड्यासमोर एक बाग आहे आणि बागेमध्ये श्रीकृष्ण मुरली वाजवतोय आणि राधाबाला मुग्ध होऊन आगगाडीकडे पाहते आहे. स्थल, काल , विषय कसल्याही जुलुमी मर्यादा न मानणार हे कलेच प्रात्यक्षिक फक्त पानवाल्याच्याच काचेवर दिसू शकत."
     
            

4 comments:

  1. This is so true. The other day I was watching some guy called Kapil Sharma. He was everything except funny. And I heard he is very big in India these days. He was so loud and the standard of the his jokes was so low that I turned off the video in five mins.

    ReplyDelete
  2. I appriciate ur daring that u atleast watch shows like comedy nights ; that Siddhu show ; fu bai fu and many more . this generation is missing too much for stopped reading last generation marathi books .Why don;t u suggest these books to ur friends on fb .

    ReplyDelete
  3. mla khop jast patlaye hey...

    ReplyDelete
  4. Yeah true.... !! n really liked that you gave references of many books here.. Our generation ought to read them...!! :-)

    ReplyDelete