Monday, 12 May 2014




                 


                 मराठी विसरत चाललेली मराठी पिढी
            
           पालक बनलेल्या सगळ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे 'मुलाला कुठल्या शाळेत घालणार?' आणि विचारणाऱ्या व्यक्तीला सर्वाधिक अपेक्षित असणारे उत्तर असते ते म्हणजे ' इंग्लिश मिडीयम.' हाच प्रश्न जेव्हा मला विचारला जातो तेव्हा माझे ' मराठी शाळेत घालणार' हे उत्तर ऐकून विचारणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ' काय मूर्खपणा करतायेत' असाच भाव असतो. मग पुढची १५ मिनिटे मराठी शाळेत घालणे कसे वेडेपणाचे आहे आणि इंग्लिश मिडीयम मध्ये घालून कसा फायदा होतो यावर सल्ले देण्यात जातात. यात सर्वात गमतीची पण वाईट वाटायला लावणारी गोष्ट म्हणजे हे भाषण देणारे अर्ध्याहून अधिक लोक शुद्ध मराठी कुटुंबातील आणि स्वतः मराठी शाळेत शिकलेले असतात आणि यातील बहुतेकांची मुले इंग्रजी शाळेत शिकत असतात.
          आजकाल मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवणे हा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. सुखवस्तू वर्गापासून अगदी कामगार वर्गातील लोकांचा मुलांना इंग्लिश शालेत घालण्याचा अट्टाहास असतो मग भलेही गरज असो व नसो, भरमसाठ डोनेशन भरणे  परवडत असो वा  नसो. अर्थात प्रश्न लोकांच्या दृष्टिकोनाचा आहे , शाळांचा नाही. शाळा मराठी असो किंवा इंग्रजी वा  हिंदी असो तिथे मिळणारे ज्ञान उत्कृष्टच असते. इंग्रजी माध्यमात शिकून फायदा होतो  हे बरोबर असले तरी मराठी शाळेत शिकून नुकसान होते असे म्हणणे पूर्ण चुकीचे आहे. जे पालक मुलांना स्वेच्छेने मराठी मध्यमात  घालू इच्छितात त्यांना वेडे ठरवणे हाच एक मूर्खपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. सध्या लोकांचा असा दृष्टीकोन झालेला आहे कि इंग्रजी ही युनिवर्सल लँग्वेज आहे म्हणून ती श्रेष्ठ , ह्या कारणाने मुले इंग्रजीत शिकली कि समाजात जास्त प्रगती करणार. आणि ह्या उलट मराठी ही  मातृभाषा वा बोली भाषा असल्याने ती केवळ घरी बोलण्यापुरतीच मर्यादित असली तरी पुरे. हे बघून खरच वाईट वाटते. महाराष्ट्राच्या बाहेर गेले की  बघायला मिळते की गुजराथी , बंगाली, दक्षिण भारतीय समाजाला आपल्या मातृभाषेचा किती गर्व आहे. मग आपले मराठी लोकच स्वतःच्या भाषेला कमी का लेखतात कळत नाही. अर्थात सगळेच महाराष्ट्रीयन सारखे नसतात. मराठीचा अभिमान बाळगणारे कट्टर मराठी आहेतच पण त्यांची टक्केवारी अर्ध्याहूनही कमीच.
            आपली मराठी कशी आपल्याच लोकांकडून कमी लेखली जाते याची उदाहरणे  रोजच्या व्यवहारात बरीच पाहायला मिळतात. बरयाचश्या मोठमोठ्या ऑफिसेस मध्ये, हॉटेल्स मध्ये लोक एकमेकांशी बोलताना, समोरचा माणूस मराठी आहे हे माहीत असून सुद्धा त्यांच्याशी हिंदी व इंग्लिश मध्ये बोलतात. केवळ आपण कसे हाय-क्लास आहोत हे दाखवण्यासाठी. दुसरे एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्याची शाळकरी आणि कॉलेज मध्ये जाणारी मुले. माझ्या बघण्यातच अशी बरीच मराठी कुटुंबातील तरुण मुले आहेत ज्यांना मराठी भाषेतले साधे साधे शब्दही माहीत नाहीत. जिथे मराठी धड बोलणे जमत नाही तिथे मराठी लिहिणे आणि वाचणे तर लांबच राहते. सर्वात असह्य गोष्ट म्हणजे हि मराठी मुले आपल्या मराठी घरातील मित्रांशी हिंदी आणि इंग्रजी मध्ये गप्पा मारतात आणि मराठीत त्यांना चार वाक्ये बोलणे जमत नाही. जेव्हा कोणी त्यांना या विषयावर काही समजवायला जाते तेव्हा ते वाद घालायलाही तयार असतात. अजून एक फॅड ह्या तरुण वर्गामध्ये बघायला मिळते ते म्हणजे अमेरिकन ढंगात इंग्लिश बोलायला जाणे. विदेशी लोकांप्रमाणे उच्चार करत भरभर इंग्लिश बोलणे बऱ्याच वेळा ऐकणाऱ्याला फार हास्यास्पद वाटते. पण बोलणाऱ्याचा आपण अगदी भारी इंग्लिश बोलतोय असा गोड गैरसमज झालेला असतो. बऱ्याचदा  असेही बघण्यात येते की इंग्लिश मिडीयम मधली मुले मराठी शाळेतील मुलांना कमी समजतात. त्यांच्यावर हसतात. वास्तविक पाहता त्यांचे  स्वतःचे भाषांचे ज्ञान सुद्धा व्याकरण दृष्ट्या यथातथाच किंवा काही वेळा चुकीचेच असते.
           ह्या पार्श्वभूमीवर जी मुले इंग्लिश मिडीयम मध्ये शिकूनही उत्तम मराठी बोलतात त्यांचे खरच कौतुक वाटते.  तसेच मराठी शाळेत शिकलेले कित्येक विद्यार्थी सुद्धा इंग्रजी उत्तम बोलतात आणि एवढेच नाही तर भारतातच नाही तर परदेशातही उत्तम व्यवसाय व नोकऱ्या मिळवून यशस्वी होतात. या सर्व परीस्थित पालकांची भूमिका ही मुलांपेक्षाही महत्वाची ठरते. कारण शेवटी मुलांचे शिक्षण आणि त्यांची घडण ठरवणारे पालकच असतात. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला शिकवणे आई-वडिलांच्याच हातात असते. मुले जशी घडवली जातात तशी घडतात. घरी मातृभाषेचे धडे देणे तसेच हिंदी इंग्रजी बोलण्याची सवय मुलांना करणे ही शिक्षकांपेक्षाही जास्त पालकांची जबाबदारी असते आणि ती त्यांनी निभावणे गरजेचे आहे. आणि इंग्रजी भाषा महत्वाची आणि मराठी केवळ बोली भाषा म्हणून कमी महत्वाची हा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक भाषेचे आपले महत्व आहे आणि प्रत्येक भाषेचा यथोचित आदर करणेही तितकेच महत्वाचे आहे.

        समस्त जनहो, आपल्या मायबोलीचा रास्त अभिमान बाळगा !!