हिमालय : एक सुंदर व्यसन
एखाद्या दिवशी भल्या पहाटे घराबाहेर पडल्यावर बाहेरची थंड हवा, हळूच सुरु झालेली पक्ष्यांची किलबिल ऐकली कि हिमालयात आल्या सारखे वाटायला लागते . गेली चार वर्ष माझ्या हिमालय भेटीत खंड पडलाय आणि त्या आठवणीनी सारखे काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत राहते. हिमालयातल्या वातावरणाची इतकी सवय झालीये कि जणू ते डोंगर माझे दुसरे घरच आहेत.
माझा हिमालयाशी सर्वात पहिला सामना झाला तो बारा वर्षांपूर्वी, माझ्या माउंटेनीअरींग कोर्स च्या निमित्ताने. हा कोर्स होता उत्तरकाशीला असलेल्या नेहरू माउंटेनीअरींग इंस्टीट्युट मध्ये. हिमालयाचा हा भाग म्हणजे गढवाल हिमालय. एक महिन्याच्या कोर्स मध्ये अठरा दिवस डोंगरात ट्रेनिंग साठी घालवायचे होते. आम्हाला या साठी नेले गेले ते गंगोत्रीला. ज्या दिवशी आम्ही गंगोत्री गावात पोहचलो आणि आजूबाजूचा हिमाच्छादित शिखरांचा देखावा नजरेत भरला तेव्हा मी अक्षरशः हिमालयाच्या प्रेमातच पडले. आमचा पहिला मुक्काम होता तो गोमुखला. गंगोत्री हिमनदीचे मुख ते गोमुख. भारतातील सर्वात मोठ्या आणि पवित्र नदीचे उगमस्थान. तिचे तिथे नाव आहे भागीरथी. गोमुखातून सतत उसळत , फेसाळत, गर्जना करत वाहणाऱ्या प्रचंड जलप्रवाहाकडे पाहताना सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा किंबहुना स्वतःचाही विसर पडतो. तिथल्या वास्तव्यातला अजून एक अविस्मरणीय नजारा म्हणजे शिवलिंग शिखराचा. पहाटे सूर्याची पहिली किरणे शिवालिंगच्या माथ्यावर पडल्यावर तो डोंगरमाथा सोनकळसाप्रमाणे चमकताना पाहणे हे एक स्वर्गसुखच होते. या ट्रेक मध्ये भरल हे प्राणी हि पाहायला मिळाले. उंच कड्यांवर सहजपणे उड्या मारत फिरणारा भरलचा कळप बघताना त्या जीवांच कौतुक वाटते.
त्या हिमालय भेटीनंतर मला हिमालयाची जबरदस्त ओढ निर्माण झाली. मग मी हिमालयीन ट्रेकला जाणे सुरु केले. मनाली भागात भृगु लेक हा माझा पहिला ट्रेक होता आणि त्यानंतर हमता पास. या दोन्ही ट्रेक्स मध्ये मी बर्फाची भरपूर मजा घेतली. कमरेपर्यंतच्या बर्फातून चालणे हे एक दिव्यच होते. त्यानंतर उत्तरांचल मधला पिंढारी ग्लेशियरचा ट्रेक मी केला. या ट्रेकचा बराचसा मार्ग नंदा देवी राष्ट्रीय उद्यानातून जातो. त्यामुळे प्राणी, पक्षी, फुलांची रेलचेल होती. बर्फ अजिबात मिळाला नाही पण पाऊस भरपूर. पिंढारी ग्लेशियरच रूप गंगोत्री ग्लेशियर पेक्षा खूपच वेगळे आहे. मूळ ग्लेशियर आणि जेथपर्यंत लोकांना जाता येते तो 'o' पॉइन्ट यांच्यात प्रचंड खोल दरी निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या भूस्खालानाचा तो परिणाम आहे. त्यामुळे ही हिमनदी दुरूनच पहावी लागते. समोरच नंदादेवी,नंदाखाट, बलजौरी अशा अनेक हिमशिखरांची भव्य डोंगररांग दिसते. चालून चालून आलेला सगळा शीण हे दृश्य पाहून नकळत निघूनही जातो.
अश्या प्रकारे दरवर्षी एक याप्रमाणे मी ट्रेक करत होते आणि प्रत्येक वेळी मनाने हिमालयाच्या जास्त जवळ जात होते. या मालिकेत पुढे आले ते मनाली परिसरातील देओतिब्बा बेस आणि सौर ताल हे ट्रेक्स. या ट्रेक्स दरम्यान हिमालयाच्या रौद्रतेचेही दर्शन झाले. भयानक पाऊस, गारपीट यांनी नाकीनऊ आणले होते पण त्यातही एक वेगळाच थरार होता. देओतिब्बाच्या ट्रेक मध्ये भरपूर प्राणी पक्षी बघता आले. आएबक्स,माउंटन विझल, हिमालयीन स्टोट असे क्वचित दर्शन देणारे प्राणी तसेच हिमालयन मोनाल हा सुंदर पक्षी जो हिमाचल प्रदेशाचा स्टेट बर्ड आहे. हिमालयन ग्रिफ़ौन, सिनारीयस व्हल्चर सारखे पक्षी दिसणे ही सुद्धा पर्वणीच होती. झाडा-फुलांची विविधताही भरपूर. ह्रोडोडेन्ड्रोनची झाडे पूर्ण सौन्दार्यानिशी फुललेली असायची. अक्रोडांची भलीमोठी झाडे अंगावर नाजूक फुले घेऊन उभी असायची. ज्युनिपरच्या झुडूपांनी पायवाटाही आच्छादलेल्या असायच्या. आयरीसच्या निळ्या-जांभळ्या फुलांची मैदानांमध्ये रांगोळी असायची. सभोवतालच्या या सृष्टीसौन्दार्यानी अवघड वाटांवर चढतानाही प्रसन्न वाटायचे.
अशा या हिमालयाचे माझे वेड दिवसागणिक वाढतच जाणारे आहे. खरे तर हे वेड नाही एक व्यसनच आहे. एक सुंदर, हवेहवेसे वाटणारे व्यसन. सगळ्यांनी आवर्जून करावे असे व्यसन. हिमालयातल्या त्या वातावरणात पक्ष्यांचा साधा किलबिलाटही भारावून टाकणारा असतो. शांततेच्या वेळी एखाद्या धनगराच्या बासरीची धून कानाला सुखावून जाते तर कधी रात्रीच्या अंधारात उठलेली कोल्हेकुई अंगाला शहारा आणते. हिमालयातली आभाळाशी स्पर्धा करणारी हिमशिखरे असोत वा प्रचंड खोल दऱ्या असोत; गोठलेली तळी अथवा सुसाट वेगाने वाहणाऱ्या नद्या असोत; सुंदर कलाकुसरीची मंदिरे असोत किंवा लाकडी घरे असोत; हिमालयाची प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करते. तुम्ही जेव्हा रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यातून वेळ काढून हिमालयाच्या कुशीत जाता तेव्हा तुम्ही पूर्णपणे भिन्न व्यक्ती बनलेले असता. सगळ्या चिंता, त्रास मागे सोडून आलेले असता. हिमालयाचे भव्य दिव्य रूप पहिले की माणसाला स्वतःच्या तुच्छतेची जाणीव होते आणि मग सगळा अहंकार मागे पडतो. निसर्गाबद्दलचा आदर दुणावतो.
जेव्हा मी हिमालयाचा विचार करते तेव्हा जाणवते कि हिमालयाचे सौंदर्य केवळ तिथल्या हिमशिखरांत किंवा निसर्गातच नाही तर तिथे राहणाऱ्या लोकांमध्येही आहे. सुंदर चेहरेपट्टी आणि त्याहून सुंदर, निर्मळ स्वभाव. हिमालयाच्या छायेत राहणारे हे रहिवासी अत्यंत मैत्रीपूर्ण आणि सदैव हसरे आहेत. त्यांचे राहणीमान खूप कष्टाचे असूनही कधीही त्याबद्दल तक्रारीचा सूर त्यांच्या बोलण्यात डोकावत नाही. आणि या जीवनपद्धतीमूळेच कदाचित त्यांच्या वागण्यात नम्रपणा, प्रेमळपणा, निसर्गाबाद्दलचा आदर ठासून भरलेला दिसतो. म्हणूनच नेहमी मदतीसाठी तयार असलेले हे लोक मोठमोठ्या शहरांतल्या आत्मकेंद्रित माणसांपेक्षा जास्त आपलेसे वाटतात.
अशा या हिमालयाच्या कितीही वाऱ्या केल्या तरी त्या कमीच वाटतात. आजही लेह-लडाख , काश्मीर , ईशान्य भारत , नेपाळ, भूतान, तिबेट अशी कितीतरी ठिकाणे मला खुणावताहेत आणि तिथे भेट द्यायची इच्छा भविष्यात पूर्ण होईलही पण एक गोष्ट कायम जाणवते कि या विशाल हिमालयाचे सौंदर्य पूर्णपणे अनुभवण्यासाठी एकच काय पण सात जन्मही अपुरेच आहेत!!
![]() |
शिवलिंग शिखर |
![]() |
पिंढारी ग्लेशियर |